24 January 2021

News Flash

आता मोफत लशीचे वचन

बिहार निवडणुकीतील भाजपच्या जाहीरनाम्यावरून वादंग

(संग्रहित छायाचित्र)

निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांच्या खरातीत भाजपने गुरुवारी नवी भर घातली. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला करोना प्रतिबंधक लस मोफत देण्याचे वचन भाजपने आपल्या जाहिरनाम्यात दिले. त्यामुळे करोनाच्या लसीकरणाबाबत केंद्राच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला असून, नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी (२८ ऑक्टोबर) केवळ सहा दिवस उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमध्ये पहिली प्रचारसभा शुक्रवारी आहे. त्याआधी गुरुवारी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात ‘मोफत लसीकरणा’चा समावेश केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. करोना प्रतिबंधक लशीची व्यापक निर्मिती झाल्यानंतर बिहारमधील जनतेचे मोफत लसीकरण केले जाईल. जाहीरनाम्यातील हे पहिले वचन असल्याचे सीतारामन म्हणाल्या.

सीतारामन यांचे हे वादग्रस्त विधान करोना लसीकरणासंदर्भातील केंद्र सरकारच्या धोरणाबाबत संभ्रम निर्माण करणारे ठरले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी, प्रत्येक राज्याला मोफत करोना लस दिली जाईल, असे पत्रकारांना सांगितल्याने गोंधळात आणखी भर पडली. देशस्तरावर मोफत लसीकरणाची कोणतीही घोषणा केंद्र सरकारने केलेली नाही.

केंद्राचे मौन, ‘आयटी सेल’कडून सारवासारव

भाजपच्या घोषणेनंतर केंद्राच्या वतीने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. काही तासानंतर भाजपचे ‘आयटी सेल’चे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट करून सारवासारव केली. बिहारसाठी भाजपने जाहीरनाम्यात मोफत करोना लसीकरणाचे वचन दिले आहे. प्रत्येक जनहिताच्या कार्यक्रमाप्रमाणे केंद्र सरकार राज्यांना करोनाची लस अत्यल्प दरात उपलब्ध करून देईल. मोफत लसीकरण करायचे की नाही, हे राज्य सरकारांनी ठरवावे. आरोग्य हा विषय राज्यांच्या अखत्यारीत येतो, असे ट्वीट मालवीय यांनी केले.

विरोधकांची टीका

देशाच्या कुठल्याही निवडणुकीत आतापर्यंत लसीकरण हा राजकीय जाहीरनाम्याचा भाग झालेला नव्हता. त्यामुळे बिहारमध्ये भाजप लसीकरणाच्या आडून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली. देशभर लसीकरणाची मोहीम कल्याणकारी योजनेअंतर्गत राबवली जात असताना निवडणुकीच्या तोंडावर केवळ बिहारसाठी करोनाची लस मोफत देण्याची भाजपची घोषणा म्हणजे ‘तुम्ही पक्षाला मत द्या, आम्ही तुम्हाला लस देऊ’, असा थेट राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केला. बिगरभाजप राज्यांचे काय? ज्यांनी भाजपला मते दिले नाही त्यांना लस मोफत मिळणार नाही का, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

निर्णय राज्यांचा : भाजप भाजपचे महासचिव आणि बिहार प्रभारी भूपेंदर यादव यांनी भाजपच्या वतीने केंद्र सरकारची बाजू मांडली. सीतारामन यांच्या विधानाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व राजकीय पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करत असतात. प्रत्येक भारतीयाला करोना लस अत्यल्प दरात उपलब्ध करून दिली जाईल. राज्य सरकारे ही लस मोफतही देऊ  शकतात. बिहारमध्ये आम्ही (भाजप) मोफत देणार आहोत, असे यादव म्हणाले.

तमिळनाडू सरकारकडूनही घोषणा

* भाजपच्या ‘मोफत लसीकरणा’चा कित्ता इतरही राज्ये गिरवू लागली आहेत. तमिळनाडूचे सत्ताधारी अण्णाद्रमुकचे नेते व मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी करोना लस मोफत पुरवली जाईल, अशी घोषणा केली.

* तमिळनाडूमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. बिहारमधील जाहीरनाम्यामुळे अन्य भाजपशासित राज्यांमध्ये मोफत लसीकरणाची शक्यता मानली जाते.

* बिहारनंतर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, पुदुचेरी, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये पुढील दोन वर्षांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

केंद्र सरकारने लस वितरणाचे धोरण जाहीर केले आहे. कृपया, लशीबरोबरच इतर खोटी वचने कधी मिळतील, हे कळण्यासाठी आपापल्या राज्यातील निवडणुकीच्या तारखा पाहा.

– राहुल गांधी, काँग्रेस नेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:18 am

Web Title: promise of free vaccine for bjp manifesto votes in bihar elections abn 97
Next Stories
1 रोजगारनिर्मितीच्या आश्वासनांची स्पर्धा
2 भारताकडून ट्विटरची कानउघाडणी
3 महिलांच्या सुरक्षेसाठी बांधील – मोदी
Just Now!
X