एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करणाऱ्या ‘अग्नि-६’ या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची निर्मिती भारत करणार आहे.
संरक्षण संशोधन विकास संस्थेचे प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी शुक्रवारी येथे ही माहिती देताना सांगितले की, आपल्या लष्करी सज्जतेत ‘अग्नि-५’ हे सर्वात प्रभावी क्षेपणास्त्र आहे. त्यापुढे एक पाऊल टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकाच अण्वस्त्रधारी क्षेपणस्त्रातून एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याच्या दृष्टीने त्याची बांधणी सुरू आहे. सध्या केवळ अमेरिका आणि रशियाकडे या धर्तीची अद्ययावत क्षेपणास्त्रे असून ‘अग्नि-६’ विकसित करण्यात यश आले तर भारत त्यांच्या पंक्तीत बसणार आहे.
या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात कोणते देश येतील, याबाबतचा तपशील उघड करण्यास त्यांनी नकार दिला. ‘अग्नि-५’ या क्षेपणास्त्राची गेल्या एप्रिलमध्ये चाचणी झाली असून त्याचा पल्ला ५,५०० किलोमीटरचा आहे. ‘अग्नि-६’चा पल्ला त्यापेक्षा अधिक असेल, असा तर्क आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे शत्रूची विमाने आणि मध्यम उंचीवरून मारा करणारी शत्रूची क्षेपणास्त्रे पाडण्यासाठीची खास क्षेपणास्त्रेही विकसित केली जात आहेत, अशी माहितीही सारस्वत यांनी दिली.