करोनाची दुसरी लाट आल्यानंतर भारताला मदत करण्याची आश्वाासने विविध देशांच्या नेत्यांनी दिली असून भारतीय अमेरिकी लोकांच्या वाढत्या दबावानंतर अमेरिकेनेही सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याआधी अमेरिकेच्या गरजा भागल्याशिवाय कुठलीही मदत देता येणार नाही अशी भूमिका अमेरिकेने लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याबाबतच्या मागणीवर घेतली होती.
भारतात गेल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णवाढ ही तीन लाखांहून अधिक झाल्याने जगभरात तो चिंतेचा विषय झाला आहे. अनेक राज्यांत प्राणवायूच्या कमतरतेमुळे लोकांचे हकनाक बळी गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी ट्विटरवर भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली असून करोना उद्रेकानंतर भारताला आवश्यक ती सर्व मदत आम्ही देऊ असे म्हटले आहे. या महाभयानक आपत्तीला सामोरे जात असलेल्या भारतीयांबाबत त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी अशाच भावना व्यक्त केल्या असून भारत हा आमचा भागीदार देश असल्याचे सांगून भारताला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वाासन दिले आहे. भारतीय अमेरिकी काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेऊन ऑक्सफर्डच्या अॅसस्ट्राझेनेका लशीच्या मात्रा भारतासाठी पाठवण्याची विनंती केली.

अमेरिकेत सध्या अॅसस्ट्राझेनेका लशीच्या ४ कोटी मात्रा पडून आहेत त्याचा वापरच होणार नाही तर त्या भारताला देण्यात याव्यात असे त्यांनी सांगितले. भारताला मदत करण्याची तयारी दर्शवणाऱ्यात फ्रान्स, युरोपीय समुदाय व ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. भारतीय लोकांच्या आम्ही पाठीशी आहोत, हा देश कोविडची दुसरी लाट झेलत असताना या लढ्यात भारताला आमचा पाठिंबा आहे असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, युरोपीय समुदाय एकजुटीने भारतीय लोकांच्या पाठीशी आहे. ही केवळ भारताची एकट्याची लढाई नसून संयुक्त लढाई आहे. ८ मे रोजी भारत व युरोपीय समुदायाची बैठक होत असून त्यावेळी यावर चर्चा होईलच पण त्याआधी आम्ही मदत देण्यासही तयार आहोत.
चीनचे परराष्ट्र मंत्री झाओ लिजियान यांनी सांगितले की, आम्ही भारताशी संपर्क साधला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतातील परिस्थितीबाबत सहवेदना व्यक्त केली असून या आव्हानाशी जागतिक पातळीवर सामना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
सिंगापूरने चार क्रायोजेनिक प्राणवायू टाक्या पाठवल्या असून संयुक्त अरब अमिरातीही भारतीय दूतावासाच्या मदतीने प्राणवायूच्या टाक्या पाठवण्याच्या विचारात आहे. युरोपीय समुदाय व रशिया यांनी प्राणवायू संबंधित व इतर औषधांची मदत भारताला देण्याचे ठरवले आहे.
स्वीडिश हवामान कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिने म्हटले आहे की, जागतिक समुदायाने ताबडतोब पुढे येऊन भारताला मदत करावी.

सौदी अरेबियाकडून प्राणवायूपुरवठा
सौदी अरेबियाने ८० मेट्रिक टन प्राणवायू भारताला पाठवला असून अदानी समूह व लिंडे कंपनी यांच्या सहकार्यातून हा प्राणवायू भारतात येणार आहे. रियाध येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, अदानी समूह व मे. लिंडे कंपनी यांच्या मदतीने प्राणवायू भारतात पाठवण्यात येत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, ८० मेट्रिक टन प्राणवायू क्रायोजेनिक टँकरमध्ये भरून भारतात आणला जात आहे. दम्मम ते मुंद्रा या मार्गाने या टँकरचा प्रवास सुरू आहे. रियाधमधील भारतीय दूतावासाचे आम्ही आभारी आहोत.

ऑस्ट्रेलियाचा कृतज्ञताभाव
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मॅरिसे पायने यांनीही भारताबाबत सहवेदना व्यक्त केली असून भारताने आम्हाला लशी पुरवून मोठे औदार्य दाखवले होते, आता भारतात दुसरी लाट आली असताना आम्ही त्या देशाला मदत करण्यास तयार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.