कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदार ज्योत्स्ना मांडी यांची मालमत्ता गेल्या ५ वर्षांत तब्बल १९८५ पटींनी वाढली असल्याचे ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक राइट्स’ (एडीआर) या निवडणूक हक्कविषयक गटाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

मांडी या  राणीबंध या अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.  प्रतिज्ञापत्रानुसार, २०१६ साली १ लाख ९६ हजार ६३३ रुपये इतकी असलेली त्यांची मालमत्ता २०२१ साली ४१ लाख १ हजार १४४ रुपये झाली आहे.

इतर उमेदवारांपैकी, २०१६ साली पुरुलिया मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक जिंकून आता भाजपमध्ये प्रवेश केलेले सुदीप कुमार मुखर्जी यांची मालमत्ता २८८.८६ टक्क्यांनी वाढली. पाच वर्षांपूर्वी त्यांनी जाहीर केलेली ११,५७,९४५ रुपयांची मालमत्ता आता ४५,०२,७८२ रुपये इतकी झाली आहे. केशियारी (एसटी) मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे विद्यमान आमदार परेश मुर्मू यांच्या मालमत्तेतही २४६.३४ टक्के वाढ झाली.

जयनगरचे विद्यमान आमदार विश्वनाथ दास यांची मालमत्ता ६९.२७ टक्क्यांनी, तर पुरुलिया जिल्ह्यातील मनबाजार मतदारसंघातील तृणमूल आमदार संध्याराणी तुडु यांची मालमत्ता ६०.२० टक्क्यांनी कमी झाली आहे.