आपल्याला ‘कामगार’ श्रेणीतून वगळल्याच्या निषेधार्थ एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने ‘हळू काम’ (गो स्लो) आंदोलन केल्यामुळे या हवाई वाहतूक सेवेच्या ११ उड्डाणांना शुक्रवारी विलंब झाला. यात मुंबईहून जाणाऱ्या ८ विमानांचा समावेश होता.
सध्या मोठय़ा तोटय़ात असलेल्या एअर इंडियाच्या नव्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या नियुक्तीची घोषणा सरकारने केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घडामोड झाली आहे.
एअर इंडिया कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आज सकाळपासून ‘हळू काम’ धोरण स्वीकारलेले असल्यामुळे विमानोड्डाणांना विलंब होत आहे. आतापर्यंत एकूण १८ उड्डाणांना उशीर झाला असून त्यात मुंबईहून जाणाऱ्या आठ, तर दिल्लीहून जाणाऱ्या तीन उड्डाणांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
श्रम मंत्रालयाने काल एका आदेशान्वये ‘एअरलाइन कमांडर’ना ‘कामगार’ श्रेणीतून वगळले. परिणामी हे कामगार संघटना स्थापन करू शकणार नसल्याने कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवणे सुरू केले आहे.
यापूर्वी वैमानिक आणि अभियंते यांना संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना ‘कामगार’ श्रेणीतून वगळावे, अशी शिफारस नागरी हवाई सेवा विभागाने श्रम मंत्रालयाला केली होती.
औद्योगिक विवाद कायदा १९४७ मध्ये गैरकामगाराची व्याख्या ‘प्रामुख्याने व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय क्षमतेत काम करणारा किंवा दरमहा १० हजार रुपयांहून अधिक पगार घेणारा कर्मचारी’ अशी करण्यात आली आहे.