तुर्कस्तानचे पंतप्रधान रेकेप तय्यीप एडरेगन यांनी निदर्शकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर तुर्कस्तानमधील निदर्शकांनी अधिक उग्र रूप धारण केल्याने निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्या आणि पाण्याचा माराही केला.
इस्तंबूलमधील तकसीम चौकात पोलिसांनी मंगळवारी सकाळी सशस्त्र वाहनांसह प्रवेश केला. निदर्शकांनी रस्त्यात ठेवलेले तात्पुरते अडथळे दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे या परिसरात लावण्यात आलेले बॅनर आणि ध्वज काढून टाकण्यासाठी १जूननंतर पोलीस पुन्हा या चौकात आले आहेत.
पोलिसांच्या कृतीमुळे नजीकच्या गेझी पार्क परिसरात तळ ठोकून बसलेले निदर्शक स्तंभित झाले. पंतप्रधान निदर्शकांच्या नेत्यांना बुधवारी भेटणार असल्याचे उपपंतप्रधान बुलेण्ट आर्निक यांनी जाहीर केल्यानंतर हे निदर्शक पुन्हा चौकात आले.
पंतप्रधानांनी चर्चेचीतयारी दर्शविली असतानाही अशा स्वरूपाची बेकायदेशीर निदर्शने तुर्कस्तानात यापुढे सहन केली जाणार नाहीत, असा इशारा उपपंतप्रधानांनी दिला. त्यानंतर निदर्शकांवर पोलिसांनी अश्रूधुर सोडला त्यामुळे काही निदर्शकांनी दगडफेकही केली.
उपपंतप्रधानांनी कडक कारवाईचा इशारा दिलेला असतानाही एका रात्रीत निदर्शक पुन्हा चौकात जमले आणि त्यांनी निदर्शने केली. गेल्या जवळपास दोन आठवडय़ांपासून तुर्कस्तानात हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. तकसीम चौकाच्या नजीकच असलेले गाझी पार्क जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर देशव्यापी आंदलनाला सुरूवात झाली.