दिल्लीत गेल्या रविवारी चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला क्षोभ रास्त असला तरी िहसा योग्य नाही, अशी भावना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी देशवासीयांना संबोधताना व्यक्त केली. या घटनेमुळे आपणही व्यथित आहोत, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले असून, देशवासीयांना संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रकरणी दिरंगाई दाखविल्याबद्दल दिल्ली पोलिसांतील दोन बडय़ा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, दोन पोलीस अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजाविण्यात आली आहे. दरम्यान, ‘त्या’ तरुणीची प्रकृती अत्यंत खालावली आहे.
दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवरील खटला ३ जानेवारीपासून सुरू होणार असून त्याची दैनंदिन सुनावणी होणार आहे. इंडिया गेटवरील िहसाचार भडकविण्यास वृत्तवाहिन्या कारणीभूत ठरल्या असल्याचा आरोप दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनी केला आहे.
लाठीमाराच्या चौकशीचे आदेश
सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे दिल्ली धुमसत असताना अमेरिकेत असलेले नायब राज्यपाल तेजिंदर खन्ना तातडीने दिल्लीला परतले आणि त्यांनी दोन सहायक पोलीस आयुक्तांना निलंबित केले. दोन पोलीस उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. जनतेचा रोष रास्त असल्याचे मत व्यक्त करून खन्ना यांनी इंडिया गेट परिसरात झालेल्या लाठीमाराचीही चौकशी करण्याचे आदेश दिले.  
दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
इंडिया गेट, राजपथ आणि विजय चौकात झालेल्या रविवारच्या िहसाचारानंतर इंडिया गेटकडे जाणारे सर्व दहाही रस्ते सोमवार सकाळपासून बंद करून तेथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आसपासची नऊ मेट्रो रेल्वे स्थानकेही सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. राजपथला छेदणारे रफी मार्ग, जनपथ आणि मानसिंह रोडही दोन्ही टोकांवर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे चाकरमान्यांसह या भागात ये-जा करणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आणि अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. जंतरमंतर येथे मात्र आंदोलन सुरूच होते. मंगळवारी भाजपचे शिष्टमंडळ राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेणार आहे.
बाबा रामदेव, व्ही. के. सिंह यांच्या विरोधात गुन्हे
रविवारी या आंदोलनात अरविंद केजरीवाल, बाबा रामदेव, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह, काँग्रेसप्रणीत एनएसयूआय आणि भाजपप्रणीत अभाविपच्या समर्थकांनी भाग घेऊन राजपथवर हुल्लडबाजी केली आणि सार्वजनिक संपत्तीची मोठय़ा प्रमाणावर तोडफोड केली, तसेच राजपथच्या दुतर्फा २६ जानेवारीच्या पथसंचलनासाठी सुरू असलेल्या तयारीचीही मोठय़ा प्रमाणावर मोडतोड व जाळपोळ केली. जमावाला भडकविल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी बाबा रामदेव आणि व्ही. के. सिंह यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
गृहमंत्र्यांकडून आंदोलकांची माओवाद्यांशी तुलना
आज आंदोलकांशी केंद्रीय गृहमंत्र्यांनी चर्चेसाठी इंडिया गेटवर जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्या कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते अशी निषेध आंदोलने करतील, परवा माओवादी सशस्त्र निदर्शने करतील, मग काय त्यांच्याशीही गृहमंत्र्यांनी संवाद साधावयास जावे काय, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
महिलांसाठी आता हेल्पलाइन
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने महिलांसाठी १८१ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांना, महिलांसाठी हेल्पलाइन सुरू करण्याविषयी विनंती केली होती.    
* दोन पोलीस अधिकारी निलंबित
* ‘त्या’ तरुणीची प्रकृती चिंताजनक
* आरोपींवरील खटला ३ जानेवारीपासून सुरू
* वृत्तवाहिन्यांनी हिंसाचार भडकाविल्याचा आरोप