ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या घटनेचा अनेकांनी निषेध केला. हा निषेध हास्यास्पद आणि पूर्वनियोजित होता, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रवक्ते आणि लेखक तुहीन सिन्हा यांनी केले आहे. लंकेश यांच्या हत्येनंतर उमटलेल्या प्रतिक्रियाही हास्यास्पद होत्या, असे ते म्हणाले. ‘पुणे टरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात ‘राजकारण म्हणजे शाप की वरदान?’ या विषयावर चर्चा सुरू होती. त्यावेळी सिन्हा बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या चर्चासत्रात काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि पत्रकार उदय माहुरकर, रिषी सुरी आदी सहभागी झाले होते. सिन्हा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर चतुर्वेदी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल काय प्रतिक्रिया द्यावी याचे भानही भाजपच्या लोकांकडे नाही, असे त्या म्हणाल्या. कोणाचे मत पटले नाही तरी आमची ऐकून घेण्याची तयारी असते. पण भाजपवाल्याचे तसे नाही. ते कोणाचे म्हणणे ऐकून घेतच नाहीत, ते तशी तयारी दाखवतच नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर नोंदवलेला निषेध हास्यास्पद ठरवणे दुर्दैवी आहे. भाजपचे लोक सत्तेच्या मस्तीत आहेत. त्यांना समाजात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींमध्येही हास्यास्पद गोष्टीच दिसतात, असेही त्या म्हणाल्या.

चतुर्वेदींच्या टीकेनंतर तुहीन सिन्हा यांनी लंकेश यांच्या हत्येनंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर निशाणा साधला. लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी प्रसारमाध्यमांसमोर आले आणि या घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, असा थेट आरोप केला.

राहुल यांचे हे वक्तव्य निश्चितच हास्यास्पद आहे, असे मला वाटते. इतकेच नाही तर कर्नाटक सरकारने लंकेश यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस त्यांनी राहुल गांधी यांना दिले पाहिजे, असा उपरोधिक टोलाही सिन्हा यांनी लगावला. या चर्चासत्रात लंकेश यांच्या हत्येच्या घटनेवरून वाद-प्रतिवाद निर्माण झाला असला तरी सिन्हा यांच्या वक्तव्याने नवीन वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.