म्यानमारमध्ये लष्कराने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या बंडाला विरोध दर्शवण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील आठवडाभरपासून सुरु असणाऱ्या आंदोलनामध्ये शुक्रवारीही मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळालं. काही ठिकाणी तर म्यानमारमधील नागरिकांनी थेट चीनविरोधात मोर्चांचे आयोजन केलं आहे. चीन हा शांतताप्रिय म्यानमारमध्ये अशांतता पसरवण्याचं काम करत आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे. ‘लाँग लिव्ह मदर सू’ आणि ‘लष्करी हुकूमशाहीचा निषेध असो’ अशा घोषणा देत हजारो नागरिक लष्करी हुकूमशाह कमांडर-इन चीफ जन. मिन आँग हलेइंगविरोधात घोषणा देत आहे. म्यानमारमधील चिनी दुतावासाच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त आहे. अनेक आंदोलकांनी शेम ऑन यू चायना म्हणजेच चीनची आम्हाला लाज वाटते असे बॅनर हातात पकडल्याचे वृत्त म्यानमार नाऊने दिलं आहे.

आंदलोनामध्ये सहभागी झालेल्या एका आंदोलकाने, “चीनने  म्यानमारमधील सेनेला लोकशाही दाबून टाकण्यासाठी प्रोत्साहन दिलं,” असा आरोप केला आहे. वेगवेगळ्या वयोगटातील नागरिक चीनविरोधातील या मोर्चांमध्ये आणि आंदोलनांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या समाजातील सर्वच स्तरातील नागरिक लोकशाही मार्गेने निवडून दिलेल्या सरकारच्या ताब्यात पुन्हा देशाचा कारभार द्यावा अशी मागणी केलीय. “लष्करी हुकूमशाहीचं समर्थन करणं बंद करा,” असे फलक घेऊन अनेक आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक निदर्शनांमध्ये कामगार संघटना, विद्यार्थी कार्यकर्ते आणि नागरिकांचा हजारोंच्या संख्येने सहभाग दिसून येत आहे. काही ठिकाणी चीनबरोबरच रशियाही या सत्तांतरणाच्या कटामध्ये सहभागी आहे का असा प्रश्न उपस्थित करणारे बॅनर घेऊन नागरिक आंदोलनात उतरल्याचे चित्र दिसत आहे.


म्यानमारमध्ये ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकप्रिय नेत्या आंग सान सूू ची यांच्या  नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे, पण या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर  गैरप्रकार झाल्याचा आरोप करून लष्कराने  मतदानाचा कौल स्वीकारण्यास नकार दिला होता. एक फेब्रवारी रोजी लष्कराने सूची यांना ताब्यात घेतले त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकला नाही.  आपणास मुक्त करण्याचे आवाहन सूची यांनी केले असून लोकांनी लष्कराचे वर्चस्व मान्य करू नये, असे त्यांनी म्हटले असल्याचे वृत्त आहे.

आणखी वाचा- टर्की काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या तयारीत; पाकिस्तानसोबत भारताविरुद्ध रचला मोठा कट

म्यानमारमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार पाडण्यासाठी चीनच जबाबदार असल्याचा आरोप इतर देशांमधील आंदोलकही करत आहेत. शांतताप्रिय म्यानमारमध्ये राजकीय अराजक माजवण्यासाठी चीनला दोषी ठरवत नेपाळ, हाँगकाँग आणि इतर देशांमध्येही आंदोलन करण्यात आलं आहे. लष्कराने केलेल्या घोषणेनुसार कमांडर-इन चीफ जन. मिन आँग हलेइंग यांच्याकडे एका वर्षांसाठी देशाचा कारभार असेल.