आयोजकांकडून आरोपाचा इन्कार

शिकागो : अमेरिकेतील शिकागो शहरात अलीकडेच जागतिक हिंदू परिषद (वर्ल्ड हिंदू काँग्रेस) पार पडली, त्यावेळी निदर्शने करणाऱ्या तरुणांच्या तोंडावर थुंकत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप ‘शिकागो साऊथ एशियन फॉर जस्टीस’ या संघटनेने केला आहे.

शिकागो साऊथ एशियन फॉर जस्टीस या संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी ७ सप्टेंबर रोजी परिषदेत निदर्शने केली. पाच महिला आणि एक पुरुष अशा सहा जणांनी अखेरच्या सत्राच्या वेळी आरएसएस टर्न अराऊण्ड आणि स्टॉप हिंदू फॅसिझम अशी घोषणाबाजी केली. या वेळी त्यांनी फलकही फडकावले. त्यावेळी परिषदेतील काही जणांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

भारतामध्ये हिंदुत्वाच्या नावावर अन्य धार्मिक अल्पसंख्याक त्याचप्रमाणे दलित वर्गावर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही आहोत, आम्ही सभागृहामध्ये शांततेने आंदोलन करीत होतो. त्यावेळी या परिषदेत सहभागी झालेल्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक जण पोलिसांसमोरच आमच्या तोंडावर थुंकला, महिलांनाही मारहाण करण्यात आली, असे संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बनावट ओळखपत्र दाखवून हे आंदोलक कार्यक्रमात घुसले होते, त्यांनी गोंधळ करताच सभागृहाबाहेर काढले, त्यांना मारहाण केलेली नाही, असा दावा आयोजकांनी केला.