23 November 2017

News Flash

दिल्लीमध्ये धुमश्चक्री

सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षीय तरुणीचे सिंगापूर येथील रुग्णालयात निधन झाल्याच्या सलग दुसऱ्या

पीटीआय , नवी दिल्ली | Updated: December 31, 2012 3:06 AM

सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षीय तरुणीचे सिंगापूर येथील रुग्णालयात निधन झाल्याच्या सलग दुसऱ्या दिवशीही येथील आंदोलकांचा जोर ओसरला नव्हता. रविवारी दुपापर्यंत शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला दुपारी एकच्या सुमारास गालबोट लागले. भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जंतरमंतर येथे बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशांतता माजविणाऱ्या या कार्यकर्त्यांची उचलबांगडी करून पोलिसांनी त्यांना दूर नेल्यानंतर येथील तणाव निवळला.
या दुर्दैवी तरुणीचे सिंगापूरमध्ये निधन झाल्यानंतर शनिवारी दिवसभर समाजातील सर्व थरांतील नागरिकांनी इंडिया गेट व जंतरमंतर परिसरात या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाण मांडले होते. या आंदोलकांमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतही सहभागी झाले होते. रविवारीही पहाटेपासून आंदोलकांचे जथ्थे जंतरमंतरजवळ जमू लागले. ‘या खटल्याचा निकाल झटपट लावा, बलात्काऱ्यांना लवकरात लवकर फाशी द्या’, आदी घोषणा आंदोलक देत होते. दुपारी एकच्या सुमारास अचानक अभाविपचे फलक हातात घेतलेले काही आंदोलक पोलिसांचे कडे तोडून कॅनॉट प्लेसच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू लागले. या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू झाली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना उचलून घटनास्थळापासून लांब नेले आणि वातावरण शांत झाले. या आंदोलकांचा अपवाद वगळता अन्य आंदोलकांनी शांतपणे निदर्शने केली.
दरम्यान, आंदोलकांची वाढती संख्या पाहता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी रविवारी दिल्लीतील पाच मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली होती.

First Published on December 31, 2012 3:06 am

Web Title: protesters clash with police at jantar mantar