पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक सोमवारी पुन्हा एकदा हिंसक बनले असून, त्यांनी इस्लामाबादच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पीटीव्ही या राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. यामुळे पीटीव्हीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे प्रक्षेपण बंद पडले आहे.
आंदोलकांनी इस्लामाबादमधील सचिवालयाचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केल्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक उडाली. यावेळी पोलीसांवर दगडफेक करण्यात आली. आंदोलक आता नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले आहेत. सुरक्षेच्या कारणांमुळे लाहोर येथे गेलेल्या नवाझ शरीफ यांना त्यांच्या निवासस्थानी परतू न देण्याचा निर्धार पाकिस्तान तेहरिक ए इन्साफच्या कार्यकर्त्यांनी केला. पीटीव्हीच्या कार्यालयातील काही पत्रकारांनाही आंदोलकांनी बेदम मारहाण केली. आंदोलक पीटीव्हीच्या कार्यालयात घुसले आहेत, असे या वृत्तवाहिनीवरील निवेदिकेने सांगितल्यानंतर लगेचच या वाहिनीचे प्रक्षेपण बंद पडले.
याआधी आंदोलकांनी पाकिस्तानातील आघाडीच्या जिओ न्यूज या वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच शनिवारी रात्री पंतप्रधानांच्या निवासस्थानासह महत्त्वाच्या सरकारी वास्तू असलेल्या परिसरात पोलिसांनी घातलेली बॅरिकेडस् मोडून शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. इस्लामाबादमध्ये पावसाची संततधार सुरू असतानाही आंदोलकांनी सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी सर्व पर्यायांचा वापर सुरू ठेवला आहे.