बँकॉक : पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी थायलंडमधील लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांनी रविवारी सलग पाचव्या दिवशीही जोरदार निदर्शने केली. ही निदर्शने बँकॉकपुरतीची मर्यादित न राहता देशातील अनेक ठिकाणी करण्यात आली.

शनिवारी  बँकॉकमध्ये अनेक ठिकाणी शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली, त्यावेळी पोलिसांनी काही जणांना अटक केली. देशातील विद्यापीठांमध्ये मार्चमध्ये निदर्शने सुरू झाली. करोनाच्या फैलावामुळे ती थंडावली होती, मात्र जुलच्या पूर्वार्धात निदर्शने पुन्हा सुरू झाली आणि त्यांनी आता जोर पकडला आहे.

थायलंडच्या उत्तरेकडील चिआंग माई या लोकप्रिय पर्यटन स्थळासह रविवारी जवळपास १२ प्रांतांमध्ये मोर्चे काढण्यात आले. शनिवारी आंदोलनाच्या नेत्यांनी समर्थकांना शहरातील स्कायट्रेन स्थानकाजवळ जमण्यास सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व स्थानके बंद करण्याचे आदेश दिले.

पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांच्या कार्यालयाबाहेर रात्रभर निदर्शक ठिय्या देऊन होते. त्यांना गुरुवारी हटविण्यात आले. त्यानंतर प्रयुथ यांनी आणीबाणी घोषित केली आणि पाचहून अधिक जणांनी एकत्र येण्यावर बंदी घातली. त्याचप्रमाणे शांतता अबाधित राखण्यासाठी सरकारला अधिक अधिकार दिले. आणीबाणीकडे दुर्लक्ष करून निदर्शक गुरुवारी रात्री बँकॉकमधील प्रमुख ठिकाणी जमले होते.