महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाच्या संवेदनशील मुद्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा मुख्यालयासह कर्नाटकच्या काही भागांत सोमवारी निदर्शने करण्यात आली. पक्षभेद विसरून राजकीय नेत्यांनी ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.

‘कर्नाटकची एक इंचही भूमी महाराष्ट्राला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी केवळ राजकीय उद्दिष्टासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करणे सोडून द्यावे’, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे सध्याचे सलोख्याचे वातावरण बिघडू शकते व त्यामुळे मी व्यथित झालो आहे. एक सच्चे भारतीय म्हणून उद्धव ठाकरे यांनी संघराज्यवादाच्या तत्त्वांबाबत त्यांची बांधिलकी व आदर प्रदर्शित करावा अशी माझी अपेक्षा आहे’, असे येडियुरप्पा यांनी ट्विटरवर लिहिले.

कर्नाटकच्या ज्या भागांमध्ये मराठीभाषक लोक बहुसंख्येने राहतात, ते भाग राज्यात सामील करून घेण्यास आपले सरकार वचनबद्ध असून, यासाठी शहीद झालेल्यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे ठाकरे रविवारी म्हणाले होते.