पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी शेकडो लोकांनी रस्त्यावरुन उतरुन पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या. पाकव्याप्त काश्मीरमधील रावलाकोटमध्ये राजकीय नेत्यांना अवैधपणे ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्ध आंदोलन करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी केली. यावेळी आंदोलकांकडून ‘आझादी’च्या घोषणादेखील देण्यात आल्या.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातदेखील पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली होती. पाकव्याप्त काश्मीरमधील हजीरा भागातील पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात घोषणा दिल्या होत्या. त्यावेळीदेखील घोषणाबाजीचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये विद्यार्थी ‘आझादी’च्या घोषणा देताना दिसत होते.

वाचा- काश्मीरमध्ये क्रिकेट सामन्याआधी पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रगीत

‘आझादी आमचा हक्क असून, आम्ही हा हक्क मिळवूनच शांत बसू,’ असे पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी म्हटले होते. पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात येणाऱ्या कारवायांविरोधात वारंवार आंदोलने केली जात आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे येथील लोकांमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान सरकार यांच्याविरोधात संतापाची भावना आहे.

वाचा- पाकव्याप्त काश्मीरमध्ये ५५ दहशतवादी छावण्या

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानविरोधी सूर उमटताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातदेखील पाकिस्तान विरोधात प्रचंड संतापाची भावना आहे. यासोबतच बलुचिस्तानातूनही स्वातंत्र्याची मागणी केली जाते आहे. नागरिकांचा विरोध दडपून टाकण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातो आहे. त्यामुळेच चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरलादेखील पाकव्याप्त काश्मीरमधून मोठा विरोध होतो आहे.