|| भक्ती बिसुरे

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते अपोलो रुग्णालयात आग्नेय आशियातील पहिल्या केंद्राचे उद्घाटन

कर्करोगावर परिणामकारकपणे उपचार करण्याची, तसेच रुग्णाच्या शरीरात कर्करोग पुन्हा उत्पन्न होऊ  नये हे सुनिश्चित करण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक प्रोटॉन उपचार पद्धती चेन्नई येथील ‘अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर’मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या केंद्राचे शुक्रवारी उद्घाटन झाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पळणीस्वामी, उपमुख्यमंत्री टी. पनीरसेल्वम, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि अपोलो हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. प्रताप रेड्डी या वेळी उपस्थित होते.

व्यंकय्या नायडू म्हणाले की, तरुणाईमध्ये व्यायामाचा अभाव आहे. तसेच बदलती आहारशैली आणि पाश्चिमात्यांचे अनुकरण केले जात आहे. त्यामुळे जीवनशैलीतील बदलांच्या परिणामातून कर्करोग, हृदयरोग, मधुमेह या आजारांचे प्रमाण वाढत आहे. भारतासमोर असलेले कर्करोगाचे आव्हान संपवण्यासाठी डॉक्टरांनी स्थानिक अन्नपदार्थ आणि व्यायामाचे महत्त्व याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. वैद्यकीय सेवा सर्वांपर्यंत पोहोचवताना ती तळागाळातील रुग्णांना परवडेल याचा विचार करणे आवश्यक आहे.

कर्करोग, मधुमेह, हृदयविकार ही भविष्यातील आरोग्य क्षेत्रासमोरील आव्हाने आहेत. ही आव्हाने त्सुनामीएवढी असल्याने त्यांचा बीमोड करण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा इतर पाश्चिमात्त्य देशांच्या तुलनेत अधिक परिणामकारक तरीही सर्वसामान्यांना परवडणारी असल्याने भविष्यात भारत आधुनिक उपचारांचे केंद्रस्थान म्हणून उदयाला येण्याची क्षमता आहे, असे डॉ. प्रताप रेड्डी म्हणाले.

प्रोटॉन थेरपी म्हणजे काय?

कर्करोगावरील उपचारांसाठी सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या रेडिएशन आणि केमोथेरपी उपचारांना आधुनिक पर्याय म्हणून प्रोटॉन उपचार पद्धतीचा वापर करता येणार आहे. जपान, चीन आणि कोरिया येथे उपलब्ध असलेले हे तंत्रज्ञान आग्नेय आशियात सर्वप्रथम चेन्नईमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उपचारांसाठी पेन्सिल बीम उपकरणाचा वापर करण्यात येणार असून त्याचा उपयोग करुन कर्करोगाचा प्रभाव असलेल्या पेशींवर अचूकपणे प्रोटॉन उपचार करणे शक्य होणार आहे. इतर उपचार पद्धतींमधून निरोगी पेशींवर दिसणारे दुष्परिणाम टाळणे, हे या तंत्राचे मुख्य वैशिष्टय़ आहे. लहान मुलांमधील कर्करोग, स्तनांचा कर्करोग, फुप्फुसांचा, त्वचेचा कर्करोग बरा करण्यासाठी ही उपचार पद्धती परिणामकारक ठरणार आहे. अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश जलाली यांनी या केंद्राबाबत माहिती दिली.

अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटरची वैशिष्टय़े

  • प्रोटॉन थेरपी भारतात आणि आग्नेय आशियात प्रथमच उपलब्ध
  • जगात केवळ जपान, कोरिया आणि चीनमध्ये हे उपचार तंत्र वापरले जात आहे
  • १३०० कोटी रुपयांची गुंतवणूक
  • इतर उपचार पद्धतींमधून उद्भवणारे दुष्परिणाम प्रोटॉन थेरपीमध्ये नाहीत
  • निरोगी पेशींना धक्का न लावता केवळ कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता