करोना व्हायरसशी लढा देण्यात एअर इंडियाने विशेष भूमिका बजावली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासोबतच जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यात भारतीय विमान कंपनीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. हे पाहून पाकिस्ताननेही भारतीयांची प्रशंसा केली. ‘कठीण परिस्थितीत करत असलेल्या मदतीसाठी आम्हाला तुमचा अभिमान आहे’, अशा शब्दांत पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने (एटीसी) स्तुती केली आहे.

लॉकडाउनमुळे भारतात अडकलेल्या युरोपीयन नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने फ्रँकफर्टला पोहोचविण्यात आलं. हे विमान जेव्हा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेलं, तेव्हा पाकिस्तान एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून भारतीयांची प्रशंसा करण्यात आली. यासंबंधीची माहिती देत एअर इंडियाचे वरिष्ठ कॅप्टन म्हणाले, “पाकिस्तानच्या हद्दीत आमचं विमान गेल्यानंतर अस्सलाम वालेकुम म्हणत आमचं स्वागत केलं. अशा कठीण परिस्थितीतही तुम्ही विमानाचं उड्डाण करत आहात. त्यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे, असं म्हणत पाकिस्तानच्या एटीसीने कौतुक केलं. त्याचसोबत आम्हाला शुभेच्छा दिल्या.” त्यानंतर भारतीय वैमानिकानेही पाकिस्तानच्या एटीसीचे आभार मानले.

आणखी वाचा : प्रिन्स चार्ल्स आयुर्वेदीक औषधांमुळे झाले बरे? जाणून घ्या सत्य..

दरम्यान, भारतात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून तो आता ३३७४ वर पोहोचला आहे. तर यामुळे ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण ३३७४ रुग्णांपैकी ३०३० रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. तर २६७ रुग्णांचे चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.