कर्नाटकच्या राजकीयनाट्यात निर्माण झालेला पेच काही सुटताना दिसत नाही हे गुरुवारी सगळ्या देशानेच पाहिलं. विश्वासदर्शक ठरावाशिवायच विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं. ज्याविरोधात भाजपा आमदारांनी ठिय्या आंदोलन केलं आणि रात्र विधानसभेतच घालवली. आता याप्रकरणी राज्यपालांनी लक्ष घातलं असून आज दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा अशी मुदतच दिली आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे.

कर्नाटकमधल्या ११ आमदारांनी राजीनामा दिल्यापासून कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ज्यादिवशी काँग्रेसच्या ८ आणि जेडीएसच्या ३ आमदारांनी राजीनामा दिला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कुमारस्वामी हे तडकाफडकी अमेरिकेहून कर्नाटकात परतले होते. तेव्हापासूनच सत्तासंघर्ष चांगलाच रंगतो आहे. लोकसभेतच्या कर्नाटकी नाटकाचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. कर्नाटकमध्ये भाजपा पैशांच्या जोरावर सरकार अस्थिर करत आहे असा आरोप राहुल गांधी यांनीही केला होता. तसेच कर्नाटकमध्ये आमदारांना फोडण्यामागे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा हात असल्याचेही काँग्रेसने म्हटले होते. तर आमचा काँग्रेसच्या आणि जेडीएसच्या वादाशी काहीही संबंध नाही त्यांना घरातले भांडण सोडवता येत नाही आणि ते आमच्यावर खापर फोडत आहेत असे प्रत्युत्तर राजनाथ सिंह यांनी दिले होते.

आरोप प्रत्यारोपांच्या या सगळ्या फैरीनंतर विश्वासदर्शक ठरावासाठी १८ जुलै ही तारीख ठरली खरी मात्र त्यादिवशी विश्वासदर्शक ठराव सादर झालाच नाही. ज्यामुळे भाजपा खासदारांनी कर्नाटक विधानसभेतच ठिय्या मांडला. एवढंच काय त्यांनी तर रात्रही याच ठिकाणी घालवली. आता आज काय घडणार? हा प्रश्न कायम असतानाच राज्यपालांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. कर्नाटकी नाटकाचा दुसरा अंक रंजक असणार आहे यात शंका नाही.

कुमारस्वामी यांच्याकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नाही. सभागृहात काल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वेळ वाया गेला. विधानसभा अध्यक्षांनी आधीपासूनच वक्त्यांसाठी कालमर्यादा निश्चित करण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे चर्चा लांबली, सभागृहात काल विश्वासदर्शक ठराव सादर झाला मात्र १६ बंडखोर आमदारांसह १९ आमदार गैरहजर होते.