देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, असे संरक्षण दलांचे प्रमुख जन. बिपीन रावत यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते त्या संदर्भाने रावत बोलत होते.

रायसिन चर्चासत्रामध्ये सहभागी होताना रावत पुढे म्हणाले की, चीनकडे वरच्या दर्जाचे सशस्त्र दल आहे त्यामुळे आपण अनेक देशांना झुकवू शकतो असा त्यांचा समज होता, परंतु भारताने खंबीर भूमिका घेत देश कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही हे सिद्ध केले, असे रावत म्हणाले.

भारताने खंबीर भूमिका घेतली आणि त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळाला, भारत दबावापुढे झुकेल असे त्यांना वाटले, मात्र तसे घडले नाही, असेही ते म्हणाले. भारत आणि चीनचे सैनिक पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.

मात्र लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि दोन्ही देशांनी फेब्रुवारी महिन्यात पांगॉँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेकडील तीरांवरून आपले सैनिक आणि शस्त्रे मागे घेतली. आता संघर्षाची जी ठिकाणे राहिली आहेत तेथूनही सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले.