करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना बँकांनी उद्योगांची कर्जाची गरज  भागवावी, तसेच नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. खासगी क्षेत्राला पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक क्षेत्राचे अस्तित्व बँकिंग व विमा क्षेत्रात गरिबांसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक सेवा या विषयावर वेबिनारमध्ये त्यांनी सांगितले, की मध्यम व लघु उद्योगांना कोविड साथीचा फटका बसला आहे. त्यांना मदतीची आवश्यकता असून अशा नव्वद लाख उद्योगांना २.४ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. लघु व मध्यम उद्योग तसेच नवोद्योग यांना पाठिंबा देण्यासाठी कर्जाची गरज आहे. सरकारने अनेक सुधारणा केल्या असून शेती, कोळसा, अवकाश ही क्षेत्रे खासगी उद्योगांसाठी खुली केली आहेत. आता आर्थिक क्षेत्राने जबाबदारी पार पाडणे गरजेचे असून आर्थिक सेवा क्षेत्राची ती जबाबदारी आहे.  लघु व मध्यम उद्योगांना पाठिंबा देताना नवोद्योगांकडे सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे बँकांनी कर्जपुरवठा वाढवावा.