सर्वोच्च न्यायालयाचे अ‍ॅटर्नी जनरलना निर्देश

नवी दिल्ली : लोकपाल व इतर सदस्यांच्या नियुक्तीसाठीच्या निवड समितीच्या बैठकीच्या संभाव्य तारखेची माहिती १० दिवसांत आपल्याला द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांना गुरुवारी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने अध्यक्षांसह न्यायिक व गैरन्यायिक सदस्यांच्या नियुक्तीसाठी निवड समितीला नावांच्या तीन पॅनेलची शिफारस केली असल्याची माहिती वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला दिली.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक शक्य तितक्या लवकर बोलावली जाईल हे निश्चित करण्यास आपण कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या सचिवांना सांगू, असेही वेणुगोपाल यांनी एस.ए. नझीर व संजीव खन्ना या न्यायाधीशांचाही समावेश असलेल्या खंडपीठाला सांगितले. या तीन पॅनेलमधील नावे जाहीर करण्याचे निर्देश देण्यासही न्यायालयाने नकार दिला.

देशाच्या पहिल्या भ्रष्टाचारविरोधी लोकपालाची नियुक्ती करण्यासाठी नावांचे पॅनेल फेब्रुवारीअखेपर्यंत सुचवावे, अशी विनंती न्यायालयाने यापूर्वी लोकपालविषयक शोध समितीला केली होती. देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीला तत्काळ काम सुरू करता यावे आणि ठरलेल्या मुदतीत पूर्ण करता यावे यासाठी आवश्यक त्या सोयी, मनुष्यबळ, सचिव आणि इतर बाबी उपलब्ध करून द्याव्यात, असेही न्यायालयाने केंद्राला सांगितले होते.