कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यंदाच्या आर्थिक वर्षांत देशभरातील आपल्या पाच कोटींहून अधिक सदस्यांसाठी नऊ टक्के व्याज जाहीर करण्याची शक्यता आहे. सन २०१३-१४ च्या आर्थिक वर्षांत हा दर पावणे नऊ टक्के होता.
एकूण हिशेब केल्यानंतर सदस्यांना यंदा नऊ टक्के दराने व्याज देणे सहजशक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले. सुधारलेला बाजार तसेच गेल्या महिन्यात केंद्रात नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आता अधिक उत्पन्नाच्या अपेक्षा वाढल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून हा दर नऊ टक्के होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे सध्या पाच लाख कोटींहून अधिक रकमेचा निधी असून सन २०१३-१४ या आर्थिक वर्षांत विविध सामाजिक सुरक्षा योजनांद्वारे संघटनेला ७१ हजार १९५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी २०१२-१३च्या तुलनेत १६ टक्के अधिक आहे. त्या वर्षी संघटनेकडे ६१ हजार १४३ कोटी रुपये जमा झाले होते.
आपल्याकडे असलेल्या निधीपैकी सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचा निधी विशेष जमा योजनेत गुंतविण्याचा भविष्य निर्वाह निधी संघटनेचा विचार आहे, असे सांगण्यात आले.