ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी संस्कृत भाषेचा आणि देशाच्या ऐतिहासिक वारशाचा अपमान केला, असे मत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केले. फ्रान्स आणि इंग्लंड या देशांमध्ये भारताचा ब्रँड म्हणून संस्कृत भाषेकडे पाहिले जाते. पण आपल्या देशात कोणी संस्कृत भाषेचं शिक्षण घेत असेल तर त्याला मागासलेल्या विचारांचा समजले जाते, असेही त्यांनी सांगितले.

गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्कृत भारतीतर्फे संस्कृत अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. गांधीनगरमधील आयुर्वेद महाविद्यालयात या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी भारताच्या ऐतिहासिक वारशाचा आणि संस्कृत भाषेचा अपमान केला. ते संस्कृत भाषेविषयी आणि ऐतिहासिक वारशाचे चुकीचे चित्र निर्माण करत आहे. संस्कृत शिकणाऱ्यांना आपल्याकडे मागास समजले जाते. पण फ्रान्स आणि इंग्लंड अशा देशांमध्ये संस्कृत भाषेला भारताचा ब्रँड म्हणून पाहिले जाते, असे त्यांनी सांगितले.

राज्य सरकार संस्कृत बोर्डाची स्थापना करण्याच्या दिशेने पावले उचलणार असून या भाषेचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञांशी चर्चा सुरु असून संस्कृत भारतीच्या सदस्यांचीही या कामात मदत घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.