भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) गुरूवारी संध्याकाळी केलेल्या आयआरएनएसएस-१ एच (IRNSS-1H) या उपग्रहाचे प्रक्षेपण अवघे एक टन वजन जास्त झाल्याने फसल्याची माहिती समोर आली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातले वृत्त प्रसारित केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील तळावरून गुरूवारी संध्याकाळी सात वाजता पीएसएलव्ही सी ३९ या प्रक्षेपकाच्या मदतीने आयआरएनएसएस-१ एच हा उपग्रह आकाशात झेपावला होता.

‘बॉलिवूडची नवी आलिया भट’; ‘त्या’ ट्विटमुळे तापसी पन्नूची खिल्ली

सुरूवातीचे तीन टप्पे पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यात उपग्रहाभोवती असलेले ‘हिट शिल्ड’चे आवरण वेगळे झाले नाही त्यामुळे उड्डाण अपयशी ठरल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र आता या उपग्रहात एक टन वजन जास्त असल्याने उड्डाण फसल्याची माहिती समोर येते आहे. उपग्रहात एक टन जास्त वजन असल्याने हिट शिल्ड वेळेवर उघडू शकले नाही. उदाहरणार्थ या उपग्रहाचा वेग प्रति सेकंद ९.५ किमी इतका हवा होता, मात्र एक टन वजन जास्त झाल्याने हा वेग ८.५ किमी इतकीच गती अंतिम टप्प्यात राहिली. त्यामुळे उड्डाण अयशस्वी झाले, अशी माहिती इस्त्रोच्या उपग्रह केंद्राचे माजी संचालक एस. के. शिवकुमार यांनी दिली आहे.

१४२५ किलो वजनाचा उपग्रह होता. या उपग्रहाच्या निर्मितीवर १२० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मागील २४ वर्षात पहिल्यांदाच उड्डाण अयशस्वी झाल्याचेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे. या उपग्रहाच्या उड्डाणाच्या चौथ्या टप्प्यात हिट शिल्ड वेगळे व्हायला हवेत होते, पहिले तीन टप्पे यशस्वी पार पडल्याने चौथा टप्पाही पार पडेल असे आम्हाला वाटले होते. मात्र या उपग्रहाच्या बाबतीत असे घडले नाही.

उड्डाणाच्या वेळी घर्षणामुळे जी उष्णता तयार होते त्यापासून सॅटेलाईटचे रक्षण व्हावे म्हणून हिट शिल्ड लावले जाते. अंतराळात जेव्हा उपग्रह स्थिर होतो तेव्हा हिट शिल्ड वेगळी होती. मात्र यावेळी असे झाले नाही अशी माहिती इस्त्रोचे चेअरमन एएस किरण कुमार यांनी दिली आहे.