नवी दिल्ली : आपण ‘पब्जी मोबाइल इंडिया’ हा नवा खेळ सुरू करण्याच्या तयारीत असल्याची गुरुवारी घोषणा करून, पब्जी कॉर्पोरेशनने भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्याची सज्जता दर्शवली.

पब्जीसह अनेक मोबाइल उपयोजने (अ‍ॅप्लिकेशन) देशाचे सार्वभौमत्व, एकता व सुरक्षा यांच्यासाठी घातक असल्याचे सांगून सरकारने गेल्या सप्टेंबर महिन्यात अशा ११८ उपयोजनांवर बंदी घातली होती. या बंदीनंतर, चीनची टेन्सेंट गेम्स या कंपनीला यापुढे भारतात पब्जी मोबाइल फ्रँचाईजी देण्याचे अधिकार राहणार नाहीत असे पब्जी कॉर्पोरेशनने सांगितले होते. या संबंधातील भारतातील सर्व जबाबदारी आपण घेऊ, असेही त्यांनी त्या वेळी म्हटले होते.

आताचा नवा खेळ खासकरून भारतीय बाजारपेठेकरता तयार करण्यात आला आहे, असे ‘प्लेयर अननोन बॅटलग्राऊंड्स’ (पब्जी) चा खेळाचा निर्माता आणि दक्षिण कोरियाच्या क्रॅफ्टन इन्कॉर्पोरेशनची उपकंपनी असलेल्या पब्जी कॉर्पोरेशनने सांगितले. स्थानिक व्हिडीओ गेम, ई-स्पोर्ट्स, मनोरंजन आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग यांची जोपासना करण्यासाठी गुंतवणुकीसोबतच खेळाचे निकोप वातावरण उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे, असे एका निवेदनात सांगण्यात आले. या दृष्टीने भारतीय उपकंपनी स्थापन करण्याचा इरादाही कंपनीने व्यक्त केला.