जगातील टॉप मोबाइल गेम्सपैकी एक म्हणजे पबजी. भारतासह संपूर्ण जगात पबजीचे असंख्य चाहते आहेत. विशेषत: तरुणाइला या गेमचं प्रचंड वेड आहे. इतकं की या गेमच्या वेडापायी खाणं-पिणं सोडल्याच्या, अगदी आत्महत्या केल्याच्याही घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र आता पबजीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ४ एप्रिल मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ५ एप्रिल मध्यरात्री १२ पर्यंत ‘पबजी’चं शटडाऊन असणार आहे. म्हणजेच हा गेम २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

पबजी २४ तास बंद राहणार असल्याची माहिती कंपनीने युजर्सना नोटिफिकेशनद्वारे दिली आहे. इतका प्रसिद्ध गेम २४ तासांसाठी बंद ठेवण्यामागचं कारण आहे करोना व्हायरस. करोना व्हायरसशी लढा देताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पबजी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

भारतातही पबजी बंद राहणार का?

होय. जगभरातील सर्व्हर बंद करण्यात येणार असल्याने भारतातही लोकांना हा गेम २४ तासांसाठी खेळता येणार नाही. चीन, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवान येथेसुद्धा पबजी बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पबजीवर बंदी करण्यात आली आहे आणि काही ठिकाणी या गेमची एक वेगळी व्हर्जन उपलब्ध आहे. चीनमध्ये हा गेम – गेम फॉर पीस नावाने उपलब्ध आहे.