नराधमास बिहारमध्ये अटक, मुलीची प्रकृती स्थिर
बलात्काराविरोधात  उग्र निदर्शने  
पूर्व दिल्लीतील पाच वर्षांच्या निरागस मुलीवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर आज दिल्लीत चार महिन्यांपूर्वीच्या दृश्याची पुनरावृत्ती झाली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे भडकलेले सर्वसामान्य नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, दिल्ली पोलीसचे मुख्यालय, काँग्रेस मुख्यालय, अ. भा. आयुर्विज्ञान संस्था आणि गांधीनगर पोलीस ठाण्यासह दिल्लीत ठिकठिकाणी उग्र निदर्शने करीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून अहवाल येताच ठोस कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री शिंदे यांनी दिले आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार यांच्यावर हे प्रकरण शेकणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
पूर्व दिल्लीतील गांधीनगर येथे पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानुष बलात्कार करणाऱ्या मनोज नावाच्या ३० वर्षीय आरोपीला दिल्ली पोलिसांनी पाटण्याहून अटक करून दिल्लीत आणले आहे. आरोपीने पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर केवळ निर्घृण बलात्कारच केला नाही, तर तिच्या शरीरास गंभीर जखमा करून अत्यवस्थ अवस्थेत तिला खोलीत बंद करून तो फरार झाला होता. शनिवारी दिल्ली पोलिसांनी त्याला बिहारच्या मुजफ्फरपूर येथून अटक करून दिल्लीत आणले. त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. दरम्यान, पीडित मुलीवर एम्समध्ये आठ डॉक्टरांचे पथक उपचार करीत असून त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियांनंतर आता या मुलीची प्रकृती स्थिर आहे. पीडित मुलगी शुद्धीवर असून आपल्या आईवडिलांशी बोलत असल्याचे एम्सचे डॉक्टर डी. के. शर्मा यांनी सायंकाळी सांगितले. चार महिन्यांपूर्वी दक्षिण दिल्लीत १६ डिसेंबर रोजी झालेल्या पाशवी सामूहिक बलात्काराची पुनरावृत्ती झाल्याने दिल्ली ढवळून निघाली.
 शनिवारी  सकाळी निदर्शकांनी या मुलीवर उपचार होत असलेल्या एम्स इस्पितळापुढे गोळा होऊन तीव्र रोष व्यक्त केला. त्याच सुमाराला आयटीओ परिसरातील दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर छोटय़ा छोटय़ा समूहांनी निदर्शनांना प्रारंभ झाला होता आणि दुपारनंतर निदर्शकांची संख्या एवढी वाढली की, या भागातील वाहतूक ठप्प होऊन इंडिया गेटपासून कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली रेल्वे स्थानक आणि चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक तुंबली. आम आदमी पार्टी, माकप, भाकप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजप, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ऑल इंडिया युथ फेडरेशन, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांच्या समर्थकांनी दिल्ली मुख्यालयाला लक्ष्य बनविले.
 सर्वत्र पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था असूनही निदर्शक अनेकदा नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र निर्माण झाले. सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिकेडस्ना ढकलून निदर्शक आपला संताप व्यक्त करीत होते. दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार यांच्या हकालपट्टीच्या तसेच आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी त्यांनी दिवसभर तीव्र निदर्शने केली. आता ठोस कृती हवी, अशी सोनिया गांधी यांनी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर नीरजकुमार यांची हकालपट्टी तसेच अन्य ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ असल्याचे मानले जात आहे.
सोनिया गांधींच्या १०, जनपथ तसेच शिंदे यांच्या २ कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानांपुढेही निदर्शकांना काबूत ठेवणे पोलिसांना अवघड झाले होते. शनिवार आणि रविवारच्या दिवशी उग्र निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन इंडिया गेट परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले होते.