सार्वजनिक ठिकाणी देहान्त शासन, हातपाय तोडणे, फटके मारणे आदी प्रकार इसिस अतिरेक्यांच्या ताब्यातील सीरियामध्ये सर्रास आढळणाऱ्या घटना आहेत, असा आरोपवजा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या एका पाहणीत काढण्यात आला आहे. सीरिया आपल्याच नागरिकांविरोधात वारंवार रासायनिक अस्त्रांचा वापर करत असल्याचेही या पाहणीत आढळून आले आहे.
इसिस अतिरेक्यांच्या ताब्यात असलेल्या सीरियाच्या उत्तर आणि ईशान्य भागात, विशेषत: शुक्रवारी एखाद्या चौकात जाहीरपणे देहान्त शासन देणे, हातपाय तोडणे, फटके मारणे असे प्रकार सर्रास घडतात. इसिसचे अतिरेकी अशा शिक्षा ‘बघण्या’साठी लहान मुलांसह नागरिकांवर जबरदस्तीही करतात, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या चौकशीत आढळून आले आहे. स्वाभाविकच शुक्रवारी चौकामध्ये जाहीरपणे दिले जाणारे देहान्त शासन हे सामान्य दृश्य असते. देहान्त शासन दिलेल्यांचे प्रेत नंतर अनेक दिवस त्याच परिसरात टाकून देण्यात येते. समाजात दहशत पसरविण्यासाठी असे प्रकार केले जातात.
या अमानुष शिक्षाही अगदी किरकोळ गुन्ह्य़ांसाठी (खरे तर गुन्हाही म्हणता येणार नाही अशा कृत्यांसाठी) दिल्या जातात. धूम्रपान, ‘योग्य पद्धतीने पेहराव न केलेल्या’ महिला नातेवाईकासोबत फिरणे अशा कृत्यांसाठी या सजा सुनावल्या जातात. १५ वर्षांच्या कोवळ्या मुलांचाही शिरच्छेद केला जातो, असे या ४५ पानी पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.