सिंगापूरचे निर्माते, पहिले पंतप्रधान ली कुआन यांना गुरुवारी हजारो नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्याबद्दल आपला आदर व्यक्त केला. कुआन यांचे सिंगापूरच्या राष्ट्रध्वजात गुंडाळलेले पार्थिव एका शवपेटिकेत नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ‘पार्लमेंट हाऊस’च्या आवारामध्ये ठेवण्यात आले होते.
९१ वर्षीय कुआन यांच्या निधनामुळे दु:खी झालेल्या अनेक नागरिकांनी अश्रूंवाटे आपला मूक शोक व्यक्त केला.सरकारी संकुलानजिक कुआन यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो लोकांनी रांगा लावल्या होत्या. कुआन यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी शोकधूनही वाजविण्यात येत होती. लोकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येणे शक्य व्हावे म्हणून शनिवापर्यंत त्यांची शवपेटिका दर्शनार्थ ठेवण्यात येणार असून येत्या रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. लोकांच्या प्रतिसादामुळे ‘पार्लमेंट हाऊस’ २४ तास खुले ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवार, २८ मार्चपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत ते खुले रहाणार असल्याची माहिती संकेतस्थळावरून देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट हे अंत्यसंस्कारांना उपस्थित रहाणार आहेत.