जनसंपर्क संकल्पनेचे डॅनियल एल्डमन यांचे मंगळवारी शिकागो येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. जनसंपर्क क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पनांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एडलमन यांनी ६० वर्षांपूर्वी अवघ्या दोन कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन कंपनी स्थापन केली होती. आज या कंपनीमध्ये साडेचार हजारपेक्षा अधिक कर्मचारी असून जगातील ६६ देशांमध्ये या कंपनीने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला आहे. मायक्रोसॉफ्ट, पेफ्झर, वॉलमार्ट यांसारख्या जगातील बलाढय़ कंपन्या एल्डमन यांच्या ग्राहक आहेत.
कोलंबिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेल्या एडलमन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात वार्ताहर म्हणून केली होती, त्यानंतर काही काळ त्यांनी संपादनाचेही काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकी सैनिकांसाठी  जर्मनीच्या प्रचाराचे विश्लेषण करणारे वृत्तपत्र चालवीत असताना त्यांनी सर्वप्रथम जनसंपर्क या आपल्यातील अभिजात कौशल्याची चुणूक सर्वाना दाखवली.
जनसंपर्काच्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण कल्पना रुजविण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रसिद्ध व्यक्तीने (सेलिब्रिटी) एखाद्या उत्पन्नाचा प्रचार करण्याची संकल्पनाही त्यांनीच रूढ केली आहे. एड्स निर्मूलन, लहान मुलांचे संगोपन या विषयांवरही त्यांच्या कंपनीने भरीव योगदान दिले आहे.