नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीमुळे भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या खिशाला चाट पडणार आहे. ‘मोदी फॉर पीएमफंड’साठी भाजपच्या आमदार-खासदारांपासून जिल्हा-ग्रामपंचायत सदस्यांना महिनाभराचे ‘सरकारी’ वेतन देणार असल्याची घोषणा पक्ष प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली.
येत्या  १७ जानेवारीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तर १८ व १९ जानेवारीला भाजपची राष्ट्रीय परिषद  दिल्लीत होणार आहे. राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्र भाजपचे सातशे कार्यकर्ते सहभागी होतील.
 या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी भाजपच्या निवडक नेत्यांची बैठक आज दिल्लीत झाली. त्याची माहिती देताना त्रिवेदी म्हणाले की, आमदार-खासदारांसह देशभरात भाजपचे एकूण १ लाख ३० हजार लोकप्रतिनिधी आहेत. या लोकप्रतिनिधींना सरकारी वेतन मिळते.
महिनाभराचे वेतन मोदी फॉर पीएम फंडात जमा करण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला आहे. त्यातून एकूण किती निधी जमा होईल, याचे उत्तर त्रिवेदी यांनी दिले नाही.
उद्यापासून सुरु होणाऱ्या भाजपच्या बैठकीत राष्ट्रीय नेत्यांसमवेत, भाजपच्या विविध संघटनांचे केंद्रीय नेते, सर्व खासदार,  आमदार व प्रदेशाध्यक्ष सहभागी होणार आहेत.
याशिवाय महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना राष्ट्रीय परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप ‘मिशन सुशासन’ छेडणार आहे.