पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यानंतर देशभरामध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा जोरदार निषेध केला जात आहे. अशातच गुजरातमधील एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने चक्क पाकिस्तान मुर्दाबाद च्या टॉलयलेटच्या टाइल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे.

या टॉयलेटच्या टाइल्सवर पाकिस्तानचा झेंडा असून त्यावर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशी अक्षर लिहिण्यात आली आहेत. या टाइल्स सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी वापरल्या जाणार असल्याचे ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या टाइल्स कारखान्याचे मालक सुरेश कौसुंदरा यांनी ‘एनएनआय’शी बोलताना पाकिस्तानचा निषेध करण्याच्या उद्देशाने आम्ही या टाइल्स बनवल्याचे सांगितले आहे. ‘पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी या टाइल्स तयार करण्यात आल्या आहेत. मागणी वाढेल त्याप्रमाणे आम्ही यांचे उत्पादन वाढवणार आहोत. मोरबी येथील सर्वाजनिक शौचालय बांधण्यासाठी या वापरल्या जातील. पण जर या टाइल्सना दुसऱ्या ठिकाणांहून मागणी आलीच तर आम्ही त्या मोफतही देण्यास तयार आहोत’, असं सुरेश यांनी सांगितलं.

पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही या टाइल्स बनवल्या आहेत असं या कारखान्यामधील एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे. या टाइल्स बनवून बांधण्यात आलेले शौचालय लोक वापरतील तेव्हा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्यासारखे होईल असंही या कर्मचाऱ्याने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मदच्या एका आत्मघातकी हल्लेखोराने १०० किलोची स्फोटके असलेले वाहन सीआरपीएफच्या वाहनाला जाऊन धडकवले होते. यामुळे झालेल्या स्फोटात जवान शहीद झाले होते.

सीआरपीएफचे २५०० हजार हून अधिक जवान ७८ वाहनांमधून प्रवास करत होते. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास श्रीनगर-जम्मू महामार्गावर दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरात परिसरात हल्ला करण्यात आला होता.