पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. प्रारंभी या आत्मघातकी हल्ल्यासाठी एसयूव्हीचा किंवा स्कॉर्पियोचा वापर केल्याचे बोलले जात होते. मात्र, एनआयएने यावरून मोठा खुलासा केला आहे. या हल्ल्यात मारूती कंपनीची इको गाडीचा वापर करण्यात आला होता. या गाडीचा मालक सज्जाद भट्ट असून तो अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी आहे. या हल्ल्यानंतर तो फरार झाला आहे.

एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक आणि ऑटोमोबाइल तज्ज्ञांच्या मदतीने याचा शोध घेतला. यात या हल्ल्यासाठी मारूती इकोचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सज्जाद भट्ट दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदमध्ये सहभागी झाला आहे. भट्टचे एक छायाचित्र मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो शस्त्रास्त्रांसह दिसतोय.

हा भीषण हल्ला करणारा पुलवामाचा आदिल अहमद डार होता. पुलवामा हल्ल्याच्या काही मिनिटानंतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एका युवकाचे छायाचित्र आणि दोन व्हिडिओ व्हायरल झाला. या दोन्ही व्हिडिओत या युवकाने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली. या व्हिडिओत स्वत:ला जैश ए मोहम्मदचा दहशतवादी असल्याचा दावा करणाऱ्या युवकाने स्वत:ची ओळख पुलवामातील काकापोरा परिसरातील गांदीबाघ येथील आदिल अहमद डार उर्फ वकास कमांडर म्हणून केली होती.