पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर तिन्ही सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. हल्ला करणाऱ्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. एकाही दहशतवाद्याला सोडलं जाणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यांनी खूप मोठी चूक केली असून त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी हल्ल्यानंतर जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा इशारा दिला होता. शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांनी शहिदांना आदरांजली वाहत पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाव न घेता इशारा दिला आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. हल्ल्यामागे जी ताकद आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल असा इशारा मोदींनी दिला.

आज प्रत्येक भारतीय शहीदांच्या कुटुंबीयांसोबत आहे. देशात आक्रोश आहे, लोकांचा रक्त उसळत आहे हे मला कळत आहे. काहीतरी केलं पाहिजे ही भावना स्वाभाविक आहे असं यावेळी नरेंद्र मोदींनी म्हटलं. लष्कराच्या शौर्यावर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचं सांगताना योग्य माहिती सुरक्षा यंत्रणापर्यंत पोहोचवावी जेणेरुन दहशतवादाविरोधातील लाढई अजून तीव्र करता येईल असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

ही वेळ संवेदनशील आणि भावनात्मक आहे. आपण सगळ्यांनी राजकारणापासून दूर राहावं असंही आवाहन यावेळी मोदींनी केलं. देश एकजूट होऊन सामना करत आहे. देश एकत्र असून हाच आवाज देशभरात ऐकू गेला पाहिजे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. जे कट रचत आहेत, त्यामुळे भारतात अस्थिरता निर्माण होईल असं वाटत असेल तर हा विचार सोडून द्या. कधी करु शकणार नाही आणि होणारही नाही असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

अनेक देशांनी अत्यंत कडक शब्दांत निषेध नोदवला असून भारतासोबत असल्याचं जाहीर केलं आहे असं सांगत मोदींनी त्यांचे आभार मानले. दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. जेव्हा सर्व देश एका दिशेने प्रवास सुरु करतील तेव्हा दहशतवाद टिकणार नाही असं मोदींनी म्हटलं. शेजारच्या देशांचे मनसुबे कधी पूर्ण होणार नाहीत. त्यांचा मार्ग विनाशाचा आपण प्रगतीच्या वाटेवर आहोत असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.