जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्य़ात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या (जेईएम) एका स्वयंघोषित कमांडरसह दोन दहशतवादी ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. या स्वयंघोषित कमांडरचे नाव फयाज पांझू असे असून १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा कट रचण्यात त्याचा सहभाग होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.

पांझू हा साथीदारासह बिजबेहरा येथे झालेल्या चकमकीत ठार झाला. अनंतनाग शहरामध्ये १२ जून रोजी सीआरपीएफ अधिकाऱ्यांवरही पांझू याने हल्ला केला होता, त्यामध्ये सीआरपीएफचे सहा जण ठार झाले होते.

ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव शानू शौकत असे आहे.

काश्मीरबाबत बनावट आदेश; सीबीआय चौकशीची मागणी

समाजमाध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झालेल्या बनावट आदेशांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी केली. केंद्र सरकारने घटनेतील अनुच्छेद ३५-ए रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याची शक्यता या बनावट आदेशामुळे वर्तविण्यात येत होती. समाजमाध्यमांवरील हे कथित आदेश वैध नाहीत, असे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.