जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात स्थानिक युवकांचा समावेश होता. या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी एक जण अवघ्या १६ वर्षांचा होता. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार त्राल येथे राहणारा १६ वर्षीय दहशतवादी फरदीन अहमद खांदे हा दहावीचा विद्यार्थी होता. विशेष म्हणजे फरदीनचे वडील जम्मू-काश्मीर पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

शनिवारी आणि रविवारच्या दरम्यान रात्री २.३० च्या सुमारास सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ५ जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांचाही खात्मा झाला होता. रविवारी संध्याकाळी उशिरा या ऑपरेशनबाबत माहिती देताना सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणाले होते की, अचानक असा हल्ला होऊ शकतो, याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आमचे जवान तयार होते. आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले असून ऑपरेशन अजून चालू आहे, लवकरच ते पूर्ण करू.

ठार झालेले दोन्ही दहशतवादी हे पुलावामा येथील असून मंजूर अहमद बाबा आणि त्रालचा फरदीन अहमद खांदे अशी त्यांची नावे आहेत. सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात रविवारी पहाटे दोन वाजता केलेल्या या हल्ल्यात कॅप्टन शरीफ-उद-दीन गनाई, तौफिल अहमद, राजेंद्र नैन, प्रदीपकुमार पडा आणि निरीक्षक कुलदीप रॉय शहीद झाले.

दरम्यान, जैश-ए-मोहम्मदने २०१६ मध्येही पठाणकोट एअरबेसवर नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच हल्ला केला होता. तेव्हा एक जानेवारी रोजी रात्री झालेल्या या हल्ल्यात ७ जवान शहीद झाले होते. सुमारे ८० तास ही चकमक सुरू होती.