जम्मू- काश्मीरमधील मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला असून झाकीर मुसा हा सुरुवातीला हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सक्रीय होता. यानंतर अल- कायदाशी संबंधित अन्सार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

पुलवामा येथील त्राल येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार गुरुवारी रात्री परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी झाकीर मुसाचा खात्मा केला. शुक्रवारी सकाळी झाकीर मुसाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शुक्रवारी या भागातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या १८ दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी १८ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

कोण होता झाकीर मुसा?

चंदीगडमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेला झाकीर मुसा हा सुशिक्षित कुटुंबातील तरुण होता. शिक्षण अर्धवट सोडून झाकीर दक्षिण काश्मीरमधील पुलवामामधील मूळगावी परतला. कट्टर इस्लामी साहित्यामुळे झाकीर मुसा दहशतवादाकडे वळला. सुरुवातीला हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत तो सामील झाला. बुरहान वानीनंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा चेहरा म्हणून तो समोर आला होता. वानीनंतर तो हिज्बुलचा कमांडर असेल अशी चर्चाही रंगली होती. पण फुटिरतावाद्यांची भरचौकात हत्या केली पाहिजे अशी धमकी दिल्याने त्याची हिज्बुल मुजाहिद्दीनमधून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर त्याने ‘अल-कायदा’मध्ये प्रवेश केला होता.