पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला घडवून आणणे कोणा एकट्याचे काम नाही, यामागे अनेकांचा हात असणार. इतकेच नव्हे सुरक्षेमधील त्रुटीही याला कारणीभूत आहे, असे मत गुप्तचर यंत्रणा रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी व्यक्त केले आहे. रविवारी एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


सूद म्हणाले, पुलवामाची घटना कोणी एका व्यक्तीने घडवून आणलेली नसेल यामागे संपूर्ण टीम असेल. मात्र, अशा प्रकारचा हल्ला सुरक्षेमध्ये कुठली तरी चूक झाल्याशिवाय होणे शक्य नाही. कारण, सीआरपीएफची वाहने येथून जाणार असल्याची दहशतवाद्यांना आधीच माहिती होती. त्यामुळे ते या कारवाईत यशस्वी झाले.

या हल्ल्याचे प्रत्युत्तर भारताने द्यायला हवे का? या प्रश्नावर बोलताना सूद म्हणाले, हा काही बॉक्सिंगचा सामना नाही. ठोशाच्या बदल्यास ठोसा असं चालत नाही. पंतप्रधानांनी याआधीच सांगितलंय की वेळ आणि ठिकाण याची निवड सुरक्षा दल करतील, त्याप्रमाणेच याविरोधात कारवाई होईल.

दरम्यान, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसून अजहर याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनची आडकाठी आहे. यावर बोलताना सूद म्हणाले, पाकिस्तानच्या म्हणण्यावर चीन हा विरोध करीत आहे. चीनने याला पाठींबा दिला तर चीनच्या शिनजियांग प्रांतातील इस्लामिक संघटना पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी हातमिळवणी करतील आणि आपली डोकेदुखी वाढेल याची भिती त्यांना आहे. चीनची ही भुमिका म्हणजे एकमेकांना फायदा करुन देण्यासारखे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pulwama kind of incident doesnt take place without security lapse somewhere says former raw chief vikram sood
First published on: 17-02-2019 at 22:20 IST