News Flash

CRPF जवानांच्या मृत्यूबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना दहशतवादी आदिलच्या वडिलांचे सणसणीत उत्तर

अनेक गावकरी त्यांचे सांत्वन केल्यानंतर अभिनंदन करत आहेत. मात्र...

गुलाम दार

पुलवामा येथे झालेल्या आत्मघातील हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. हा आत्मघाती हल्ला करणारा दहशतवादी आदिल अहमद दार यांच्या घरी येऊन फुटीरतामतवादी स्थानिकांनी आदिल याच्या वडिलांचे अभिनंदन केले. तुमच्या मुलाने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या जवनांच्या बसला आदळवल्याने ४० सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल तुम्हाला ‘मुबारक’ असं म्हणणाऱ्यांना आदिलच्या वडिलांनी सणसणीत प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही सीआरपीएफच्या जवनांच्या मृत्यूचा आनंद व्यक्त करत नाही असं त्यांनी स्पष्टपणे अभिनंदन करणाऱ्यांना सांगितले आहे.

जैश ए महम्मदसाठी काम करणाऱ्या आदिलने १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा जिल्ह्यात ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० हून अधिक जवान शहीद झाले असून २० जण जखमी झालेत. गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठा हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या आदिलच्या घरी अनेक स्थानिकांनी भेट दिली आहे. आदिलने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबद्दल अनेकजण त्याच्या कुटुंबीयांना विचारत आहेत. तर काही दहशतवादाला समर्थन करणाऱ्या गावकऱ्यांनी आदिलच्या या दृषकृत्याबद्दल त्याच्या घरच्यांचे अभिनंदनही केले आहे. यावर आदिलचे वडिल गुलाम दार यांनी दहशतवादाला समर्थन देणाऱ्या आणि मुलाच्या कृत्याबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. ‘आम्ही सीआरपीएफच्या जवानांच्या मृत्यूचा आनंद साजरा करत नाही. आम्हाला त्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची जाणीव आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून इथे आम्ही हिंसाचार पाहिला आहे’ असं मत गुलाम दार यांनी व्यक्त केले आहे.

‘इंडिया टुडे’ने याबद्दल दिलेल्या वृत्तानुसार अनेकजण दार यांच्या घरी येऊन सांत्वन केल्यानंतर त्यांचे अभिनंदन करत आहेत. आदिलच्या गावात मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया सुरु असतात असं ‘इंडिया टुडे’ने म्हटले आहे. दरम्यान गुलाम दार यांनी आदिलने केलेल्या या कृत्यानंतर सरकारकडे एक मागणी केली आहे. ‘मी तरुणांना कोणताही संदेश देऊ इच्छित नाही. पण सरकारकडे माझी एक मागणी आहे. स्थानिक तरुणांनी दहशतवादाच्या मार्गाला जाऊ नये म्हणून सरकारने काहीतरी उपाययोजना करायला हव्यात’ असं मत गुलाम यांनी व्यक्त केले आहे. ‘गेल्या वर्षी १८ मार्चला आदिल आम्हाला काहीच न सांगता घरातून निघून गेला. त्यानंतर आम्ही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक ठिकाणी त्याच्या फोटोचे पोस्टर्स लावले पण तो काही घरी परत आला नाही. काही महिन्यानंतर तो दहशतवादी झाल्याचे आम्हाला समजले अशी माहिती आदिलबद्दल बोलताना गुलाम दार यांनी दिली. मात्र आदिल घरातून निघून गेल्यावर आम्हाला एकदाच भेटला होता असेही गुलाम यांनी सांगितले. अदिलचा चुलत भाऊ देखील दहशतवादी होता. आदिल ‘जैश’मध्ये सामील होण्याच्या ११ दिवस अगोदरच त्याच्या चुलत भावाचा चकमकीत मृत्यू झाला होता अशी माहिती गुलाम दार यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर अहमद हा आदिलचा मित्र असून तो देखील १८ मार्च रोजीच घरातून निघून गेला होता. आदिल बेपत्ता असल्याची तक्रारही कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली. मात्र, काही दिवसांनी सोशल मीडियावर आदिलचे फोटो व्हायरल झाले त्यात आदिलच्या हातात बंदुक होती आणि तो जैश- ए- मोहम्मदचा दहशतवादी असल्याचे म्हटले होते.

आदिलचे वडील गुलाम हसन दार यांचे छोटे दुकान आहे. आदिलने १२ वीचे शिक्षण अर्धवट सोडले होते. शिक्षण सोडल्यानंतर तो घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या वखारीत काम करत होता. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर २०१६ साली जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या आंदोलनात आदिल सहभागी झाला होता. आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात आदिलच्या पायाला गोळी लागली होती, असे कुटुंबीयांनी सांगितले.

दोन्ही बाजूंची लोकं मारली जातात हे पाहून वाईट वाटते. राजकारणी हे फक्त राजकारण करत असून ते मूळ समस्येवर तोडगा काढत नाही. जम्मू- काश्मीरमधील तरुण हातात बंदूक का घेत आहेत, याचा राजकरण्यांनी विचार केला पाहिजे, असे मत आदिलच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले आहे. दरम्यान ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे हल्ला करणाऱ्या आदिलला या हल्ल्यापूर्वी सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते, असे माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 2:12 pm

Web Title: pulwama suicide bombers father says not rejoicing crpf deaths even as visitors congratulate him
Next Stories
1 सिद्धू भडकले, पंजाब विधानसभेत आमदारांबरोबर वादावादी
2 पीएफ खातेधारकांना दिलासा, इपीएफओचा व्याजदर ‘जैसे थे’ राहणार?
3 शरद पवारांना शकुनी मामा म्हणता, तुमची औकात काय?-अजित पवार
Just Now!
X