जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने आज(दि.16) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकारकडून पुलवामा हल्ला, त्यानंतरच्या घडामोडी आणि पुढे केली जाणारी संभाव्य कारवाई, याबाबत तपशीलवार माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली असून यासाठी देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजता संसदेच्या ग्रंथालयात ही सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून या संकटकाळात संपूर्ण देश एकजूट असल्याचा संदेश दिला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, झाशी येथील सभेत बोलताना पुलवामाचा बदला घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला देण्यात आले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.