गुरूवारी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतावादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० हून अधिक जवान शहिद झाले. आठवडाभरापूर्वी झालेल्या या हल्ल्यानंतर अनेक स्तरामधून या शहीदांच्या कुटुंबाना मदत करण्यासाठी लोक पुढे येताना दिसत आहे. खेळाडू, अभिनेते, राजकारणी, सामान्य जनता अशा सर्वांनी आपआपल्या पद्धतीने पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुबियांना मदत करत आहेत. याच मदत करणाऱ्यांच्या यादीमध्ये एका मुख्याध्यापिकेचाही समावेश झाला आहे. शहीद जवानांच्या पत्नीचा आक्रोश आणि अश्रू पाहून बरेलीमधील एका महिला मुख्याध्यापिकाचे डोळे पाणावले. त्या महिला मुख्याध्यापिकाने आपले सोनं विकून जवानांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

बरेली येथील एका खासगी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करणाऱ्या किरण झागवाल यांनी वडिलांनी दिलेल्या सोन्याच्या बांगड्या विकून १ लाख ३८ हजार ३८७ रूपये पंतप्रधान मदत कक्षामध्ये जमा केले आहेत. ही मदत शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात यावी अशी विनंती किरण झागवाल यांनी केली आहे.

किरण झागवाल म्हणाल्या, ज्यावेळी मी TV वर शहीद जवानांच्या पत्नींचा आक्रोश आणि अश्रू पाहिले त्यावेळी मी सून्न झाले. माझ्या डोक्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा विचार आला. मी त्यांना कशा पद्धतीने मदत करू शकते असा विचार करत होते. त्यावेळी वडिलांनी प्रेमाने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि त्यामधून आलेली रक्कम पंतप्रधान मदत कक्षामध्ये जमा केली.

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे अवाहन यावेळी किरन झागवाल यांनी केले. त्या म्हणाल्या की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. प्रत्येक व्यक्तीने एक रूपया जमा केला तर खूप मोठी रक्कम जमा होईल.

 जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मदच्या एका आत्मघातकी हल्लेखोराने १०० किलोची स्फोटके असलेले वाहन सीआरपीएफच्या वाहनाला जाऊन धडकवले होते. यामुळे झालेल्या स्फोटात जवान शहीद झाले होते. सीआरपीएफचे २५०० हजार हून अधिक जवान ७८ वाहनांमधून प्रवास करत होते. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास श्रीनगर-जम्मू महामार्गावर दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरात परिसरात हल्ला करण्यात आला होता.