जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले आहेत. तर या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात सुसाईड बॉम्बर म्हणून सहभागी झालेल्या आदिल दर याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. आत्मघातकी दहशतवादी म्हणून सहभागी झालेल्या आदिल दर याने हल्ल्यापूर्वी काही वेळ आधीच हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तो म्हणतो, या हल्ल्यासाठी मागील एक वर्षापासून तयारी सुरु होती. यामध्ये तो काश्मीरी मुस्लिमांच्या अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यांबाबत बोलला आहे.

या व्हिडियोमध्ये आदिलच्या हातात एक रायफल असून त्याच्या मागे जैश-ए-मोहम्मदचा बॅनर असल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात लष्कराच्या एक डझनहून अधिक वाहनांवर हल्ला करण्यात येणार असल्याचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अधिकृत व्यक्तीकडून सांगण्यात आले. आता झालेल्या हल्ल्यात ५० हून अधिक वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या लक्ष्य केले. एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात २० जवान शहीद झाले आहेत.

आदिल अहमद दर उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, असे वृत्त ग्रेटर काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे.