जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मदत करण्यासाठी मारुती सुझूकी कंपनीचे एक पथक पुलवामा येथे पोहोचले आहे. दहशतवादी हल्ल्यात वापरलेल्या गाडीच्या मालकाचा शोध घेण्यासाठी हे पथक मदत करणार आहे.

पुलवामा येथे गुरुवारी जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याने आत्मघातकी हल्ला केला. स्फोटकांनी भरलेल्या इको कारने सीआरपीएफच्या बसला धडक दिली होती. या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात मारुती सुझूकी इको कारचा वापर करण्यात आला होता. स्फोटामुळे कार कोणाच्या मालकीची होती, याचा शोध घेणे हे आव्हान होते. अखेर तपास यंत्रणेने या प्रकरणात थेट मारुती सुझूकी या कंपनीच्या अभियंत्यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मारुती सुझूकीच्या अभियंत्यांचे पथक जम्मू- काश्मीरमध्ये पोहोचले आहे. तपास यंत्रणांना घटनास्थळावरुन कारचा एक लोखंडी तुकडा सापडला असून या तुकड्यावर आकडे कोरलेले आहे. या आधारे कारचा मालक कोण, कार चोरण्यात आली होती का, याबाबतचा तपशील उघड होणार आहे. हल्ल्याच्या तपासात हा महत्त्वाचा पुरावा ठरु शकणार आहे.

‘एनआयए’चे पथक या हल्ल्याप्रकरणी जैश- ए- मोहम्मदचा स्थानिक दहशतवादी मुदासिर अहमद खान याचा शोध घेत आहे. या हल्ल्यात त्याचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आहे. मुदासिरला अटक केल्यास आरडीएक्सचा साठा भारतात कसा आणला, याची माहिती मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.