माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचं मत व्यक्त केल्याने टीकेचे धनी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ३९ जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे पाकिस्तानला धडा शिकवला जावा अशी मागणी होत असताना नवज्योत सिंग सिद्धू मात्र चर्चेची भाषा करत आहेत. यामुळे लोकांनी त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे.

दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो असं सांगताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी फक्त चर्चेने पाकिस्तानसोबत असलेले संबंध सुधारले जातील असं म्हटलं आहे. ‘या हल्ल्याचा निषेध आहे. हा भ्याड हल्ला आहे. चर्चेतून यावर कायमचा तोडगा काढला पाहिजे. कुठपर्यंत जवानांनी बलिदान द्यायचं ? कधीपर्यंत हा रक्तपात सुरु राहणार आहे ? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. एकमेकांवर आरोप करुन काही फायदा होणार नाही’, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘या हल्ल्याचा कर्तारपूरशी काय संबंध ? यामुळे लोक, ह्रदय जोडले जात आहे. जेव्हा एखादी व्यक्ती भक्तीचा मार्ग स्विकारते तेव्हा त्याच्यात बदल होतात. आपण समस्येचं मूळ कारण शोधून त्यावर उपाय काढला पाहिजे’, असंही नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यावर वेगळं मत व्यक्त केलं असताना नवज्योत सिंग सिद्धू यांच्या तोंडी वेगळी भाषा आहे. राहुल गांधी यांनी सर्व विरोधक सरकार आणि जवानांसोबत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं. हा दुखाचा क्षण आहे. आम्ही भारतीय सरकार आणि सुरक्षा दलांना पूर्ण समर्थन देत आहोत. याशिवाय आम्ही कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही असं राहुल गांधी बोलले होते.

निवृत्त मेजर जनरल जी डी बक्षी यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार टीक करत त्यांचं वक्तव्य लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे. सिद्धू यांनी याआधीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला हजेरी लावत वाद ओढवून घेतला होता.