पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सीआरपीएफचे जवान प्रदीप सिंह यादव यांच्या अखेरच्या फोन कॉलची मन हेलावून टाकणारी कहाणी समोर आली आहे. प्रदीप सिंह यादव पत्नी नीरज देवी बरोबर फोनवर बोलत असताना आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही कार बसला धडकवली.

मी माझ्या नवऱ्याबरोबर फोनवरुन बोलत असताना दुसऱ्या बाजूने मला कानठळया बसवणारा आवाज ऐकू आला. त्या आवाजानंतर शांतता पसरली आणि फोन कट झाला. काही तरी अघटित घडल्याची मला जाणीव झाली. मी खुशाली विचारण्यासाठी त्यांना अनेकदा फोन केला पण तो पर्यंत माझ्यासाठी सर्व काही संपले होते असे नीरज देवी म्हणाल्या.

थोडयावेळाने सीआरपीएफच्या नियंत्रण कक्षातून माझ्या नवऱ्याचा स्फोटामध्ये मृत्यू झाल्याची माहिती देणारा फोन खणखणला अशी आठवण नीरज देवी यांनी सांगितली. पुलवामामध्ये स्फोट झाला त्यावेळी नीरज देवी त्यांच्या दोन मुलांसह कानपूरला आईकडे होत्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच त्या आपल्या घराकडे निघाल्या.

प्रदीप सिंह यांना सुप्रिया आणि सोना या दोन मुली आहेत. सुप्रिया (१०) तर सोना दोन वर्षांची आहे. काही वेळापूर्वी प्रदीपशी बोलताना आनंदात असणारी नीरज सीआरपीएफकडून फोन आल्यानंतर कोसळून गेली. प्रदीप शहीद झाल्याची बातमी ऐकताच तिने हंबरडा फोडला असे एका नातेवाईकाने सांगितले. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे.