जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमालीचा वाढला आहे. हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीसाठी धावाधाव सुरु आहे. हल्ला झाल्यास आम्ही सुद्धा प्रत्युत्तर देऊ असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या परिस्थितीत युद्धाचा भडका उडाल्यास दोन्ही देशांची काय तयारी आहे ते जाणून घेऊया.

लष्करी बजेट
– आयआयएसएस या संस्थेच्या अहवालानुसार भारताने २०१८ मध्ये १२ लाखांच्या घरात असलेल्या आपल्या सैन्य दलासाठी ५८ अब्ज डॉलर किंवा जीडीपीच्या २.१ टक्के तरतूद केली आहे.

– मागच्यावर्षी पाकिस्तानने ६.५० लाखांच्या घरात असलेल्या आपल्या सैन्य दलासाठी ११ अब्ज डॉलर खर्च केले. त्यांना परदेशातून १० कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य मिळाले.

– स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार १९९३ ते २००६ दरम्यान पाकिस्तानने वार्षिक सरकारी खर्चाच्या २० टक्क्यापेक्षा जास्त रक्कम लष्करावर खर्च केली आहे.

क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र

– दोन्ही देश अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. भारताकडे नऊ प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. यात अग्नि-३ चा समावेश होतो. अग्नि-३ ची रेंज तीन ते ५ हजार किलोमीटरपर्यंत आहे.

– पाकिस्तानने चीनच्या मदतीने क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित केला. त्यांच्याकडे छोटया आणि मध्यम रेंजची भारताच्या कुठल्याही भागापर्यंत पोहोचू शकतात अशी क्षेपणास्त्रे आहेत. पाकिस्तानकडे शाहीन २ हे दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज २ हजार किलोमीटर आहे.

– एसआयपीआरआयच्या माहितीनुसार पाकिस्तानकडे वेगवेगळया आकाराची १४० ते १५० अण्वस्त्रे आहेत. तेच भारताकडे १३० ते १४० अण्वस्त्रे आहेत.

लष्करी सुसज्जता

– लष्करी आघाडीवर संख्याबळामध्ये पाकिस्तानच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. भारताकडे १२ लाखांचे सैन्य दल आहे.

– भारताकडे ३५६५ रणगाडे असून ३१०० सैनिकी वाहने आहेत.

– भारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या सैन्यदलाची संख्या निम्मी आहे. पाकिस्तानकडे ५ लाख ६० हजार सैन्य आहे.

– पाकिस्तानकडे २,४९६ रणगाडे असून १,६०५ सैनिकी वाहने आहेत.

भारताकडे मोठे सैन्यदल असले तरी देखभाल, सुट्टे भाग आणि शस्त्रास्त्रांच्या कमतरतेमुळे संरक्षण दलांची क्षमता मर्यादीत आहे असे आयआयएसएसच्या अहवालात म्हटले आहे.

एअर फोर्स
– भारतीय हवाई दलात १ लाख २७ हजार २०० जवान असून ८१४ फायटर विमाने आहेत. पाकिस्तानच्या तुलनेत भारताचे हवाई दल मोठे असले तरी फायटर स्क्वाड्रनची कमतरता मुख्य आव्हान आहे.

– चीन आणि पाकिस्तान बरोबर एकाचवेळी युद्ध लढण्यासाठी भारताला ४२ स्क्वाड्रनची आवश्यकता आहे. रशियन बनावटीची मिग-२१ विमाने लवकरच निवृत्त होणार आहेत. लवकर नवीन विमाने घेतली नाहीत तर २०३२ साली भारताकडे फक्त २२ स्क्वाड्रन असतील.

– पाकिस्तानकडे ४२५ फायटर विमाने आहेत. त्यात चिनी बनावटीची एफ-७पीजी आणि अमेरिकन बनावटीची एफ-१६ विमाने आहेत.

– अचूक हल्ल्याची क्षमता वाढवण्यासाठी पाकिस्तान आपल्या हवाई दलाच्या ताफ्याचे अत्याधुनिकीकरण करत आहे. गुप्त माहिती गोळा करण्यासाठी टेहळणी क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे.

नौदल

– भारतीय नौदलाकडे एक विमानवाहू युद्धनौका असून १६ पाणबुडया, १४ विनाशिका, १३ फ्रिगेटस आहेत. १०६ गस्ती आणि लढाऊ जहाजे आहेत. ७५ फायटर विमाने आहेत. नौदल आणि हवाई विभाग मिळून एकूण ६७,७०० नौसैनिक सेवेमध्ये आहेत.

– दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला मोठी किनारपट्टी नसल्याने त्यांचे नौदल तुलनेने छोटे आहे. त्यांच्याकडे नऊ फ्रिगेट, आठ पाणबुडया १७ गस्ती नौका आणि आठ फायटर विमाने आहेत.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pulwama terror attack war preparedness of india pakistan
First published on: 20-02-2019 at 14:23 IST