‘बाबा, तुम्ही ईदला घरी येईन असे आश्वासन दिले होते. मग तुम्ही दिलेला शब्द का नाही पाळला. तुम्ही आम्हाला एकटंच सोडून गेलात’…. पुलवामामधील न्यायालयाच्या आवारातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जम्मू- काश्मीरच्या पोलीस दलातील कॉन्स्टेबल गुलाम हसन यांचा मुलगा रडत रडत त्यांच्या भावना व्यक्त करत होता.. त्या मुलाचे हे वाक्य ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले.

मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील न्यायालयाच्या आवारात तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात गुलाम हसन आणि गुलाम रसूल हे दोन कॉन्स्टेबल शहीद झाले. मंगळवारी दुपारी दोघांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. गुलाम हसन हे बारामुल्लामधील रफियाबादचे रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. हसन यांना मोठा मुलगा २२, दुसरा मुलगा १९ तर लहान मुलगा १३ वर्षांचा आहे.

वडिलांचे पार्थिव बघून या मुलांना रडू आवरता येत नव्हते. ‘बाबा तुम्ही आम्हाला ईदला घरी येईन असे आश्वासन दिले. आपण एकत्र ईद साजरी करणार होतो. मग तुम्ही हा शब्द का नाही पाळला बाबा’, असं ती मुलं वारंवार बोलत होती. बाबा तुमच्या मानेजवळ अजूनही दुखतंय का, मी मसाज करु का, असे त्यांचा एक मुलगा वडिलांच्या पार्थिवावर हात फिरवून विचारत होता.

गुलाम हसन यांच्याप्रमाणेच गुलाम रसूल यांनी देखील ईदला घरी जाण्याचा बेत आखला होता. गुलाम रसूल यांनी त्यांच्या एका नातेवाईकाला फोन करुन उद्या संध्याकाळी घरी येईन. यावेळी आपण सर्वजण एकत्र ईद साजरी करु असं रसूल म्हणाला होता, हे सांगताना नातेवाईकांना अश्रू आवरता येत नव्हते. रसूल हे कुपवाड्याचे रहिवासी असून त्यांना १२ आणि सात वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांची मुलगी आहे. त्यांची पत्नी गृहिणी आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंत्ययात्रेला हजारो ग्रामस्थ उपस्थित झाले. ‘पोलीस कर्मचाऱ्याने दिवाळी किंवा ईदला घरी येणं हे दुर्मिळच असते. या वेळी दोघेही घरी आले पण शवपेटीतून, अशी भावूक प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली.