जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरक्षादलाने कारवाई सुरू केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज सात जणांना ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या सातही जणांकडे कसून चौकशी केली जात आहे. पुलवामा जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून या सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट पुलवामाच्या त्राल परिसरात रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 2016 मध्ये हिजबुलचा टॉप कमांडर बुरहान वानीचा खात्मा त्राल येथेच झाला होता. त्याच्या खात्म्यानंतर पुढील चार महिने काश्मीर खोऱ्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती.

या हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरीक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती असा पोलिसांना संशय आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल भागात तो जैशचं नेटवर्क सांभाळतो, अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिली असून त्याचाही शोध घेतला जात आहे.