जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशात सध्या ‘देशभक्तीचे वारे वाहू लागले आहेत. सध्या देशभक्तीच्या नावावर सगळे एकत्र आले आहेत. आपल्याला याचे रुपांतर मतांमध्ये करावे लागेल, असे वक्तव्य भाजपा नेते आणि गुजरात भाजपाचे प्रवक्ते भरत पंड्या यांनी केले आहे.

भाजपाकडून आयोजित कार्यकर्ता संवाद शिबिरामध्ये बोलताना पंड्या यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘तुम्ही सर्वांनी काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्याचे व्हिडिओ, फोटो पाहिले असतील. देशभक्ती दाखवण्यासाठी सर्व मतभेद दूर करुन देशातील सर्व लोक एकत्र आले आहेत. रॅली आणि आंदोलने करून या लोकांनी देशासाठी असलेले आपलेले प्रेम व्यक्त केले आहे. मनमोहन सिंहांच्या सरकारमध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता….त्यावेळी कसे वातावरण होते. संसदेत कशाप्रकारे मुद्दा उठविण्यात येत होता. त्यावेळी अशी चर्चा होती की हल्लेखोर दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळत आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात होती. मात्र, आज स्थिती बदलली आहे. सगळा देश सध्या राष्ट्रभक्तीच्या भावनेत आहे. या एकतेला मतांमध्ये परिवर्तीत करण्याची जबाबदारी आपली आहे’. असं पंड्या म्हणाले.

यानंतर बोलताना पंड्या यांनी, कार्यकर्त्यांना बोलताना सारासार विचार करुन बोलण्याचा सल्ला दिला. तसंच तुमच्या कोणत्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी असंही सांगितलं आहे.