पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे एक तास झालेल्या या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. अद्यापही दाट ढगांमुळे शहरातील वातावरण अंधारलेले असून रिमझिम पाऊस सुरु आहे.


शहरात गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर तासभर तुफान पाऊस कोसळला. यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी वातावरण स्वच्छ असताना आणि उकाडा जाणवत असताना दुपारनंतर अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळीच कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच श्रेधातिरपट उडाली.

पुणे शहरातील कोथरुड, डेक्कन, स्वारगेट, पेठांचा भाग तसेच शिवाजीनगर, कँम्प भागात मुसळधार पाऊस पडला. तर पिंपरी-चिंचवड शहराच्या पिंपळे गुरव, दापोडी, कासारवाडी, पिंपरी-चिंचवड, राहटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाकड या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. एक तास चाललेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे आज झालेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.